‘एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही देणार,’ अशी शपथ मुलांनाही घ्यायला लावा : चित्रा वाघ

blank

मुंबई : जागतिक प्रेमदिनाच्या दिवशीच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या महाविद्यालातील विद्यार्थिनींना ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनीच या विद्यार्थीनीना हि शपथ दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ” फार चं विचित्र !! का मुलींनी अशा शपथा घ्यायच्या या पेक्षा मुलांना शपथ घ्यायला लावा की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही देणार,छेडछाड करणार नाही कोणावर ॲसिड फेकणार नाही जिवंत जाळणार नाही वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार …..” असं ट्वीट करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

अमरावतीच्या या महाविद्यालयात ‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’अशी शपथ महाविद्यालयातील शिक्षकांनीच विद्यार्थिनींकडून घेतली आहे.

अलीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपला निर्णय उपयुक्त ठरेल, असा विश्वास विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे. अमरावतीच्या मुलींचा आदर्श घेण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडाच्या पार्श्वभूमीवर या शपथेला वेगळं महत्त्व आलं आहे.