‘त्या’ नगरसेविकेच्या पतीला दसरा चौकात उभे करून गोळ्या झाडा, चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा- कोल्हापूरात इचलकरंजी येथील एका नगरसेविकेच्या पतीने स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विकृत पित्याने स्वतःच्याच १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे समोर आले आहे. विकृती कुठे आणि कितपर्यंत फोफावत गेली आहे त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. अशा विकृतांना दसरा चौकात उभे करून गोळ्या झाडा अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे. त्या कोल्हापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आज स्त्री कुठेच सुरक्षित नाही. खरंतर लोकांची मती सुन्न करण्याचे काम सुरू आहे. दिवसेंदिवस असे विकृत प्रकार समोर येत आहेत. या प्रकरणाच्या बातम्या होतात, लोक त्यावर बोलतात मात्र विकृतांवर काहीच कारवाई होत नाही. या विकृतांना ठेचून काढण्याचे काम समाजातर्फे झाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुलीला जन्माआधी आणि जन्मानंतर देखील वेदना सहन कराव्या लागतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान इचलकरंजी येथे झालेल्या प्रकराबाबत आयजी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेणार असल्याचीही माहिती दिली. राज्यातील प्रत्येक महिला ही पिडीत मुलीच्या व त्या धाडसी मातेच्या लढ्यात तिच्या सोबत आहे असेही त्या म्हणाल्या.