राष्ट्रवादीच्या अतंर्गत गटबाजीला कंटाळून दिली सोडचिट्टी : चित्रा वाघ

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर मुंबईतील गरवारे क्लब येथे पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

चित्रा वाघ यांचा भाजप पक्ष प्रवेश हा अतिशय धक्कादायक मानला जात आहे. मात्र भाजपात प्रवेश करताचं चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. त्यामुळेचं मी भाजपात प्रवेश केला असल्याच स्पष्टीकरण त्यांनी दिल. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे अतंर्गत गटबाजीला कंटाळून सोडचिट्टी दिली आहे. मी गद्दार नाही किंवा मी पळून गेले नाही. मी माझा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन कळविला होता.

दरम्यान चित्रा वाघ या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव भाजप वासियांचे स्वागत केले. तर भाजपात येणाऱ्या नेत्यांची स्तुती केली आहे. भाजपात येणाऱ्या नेत्यांना आम्ही कोणताही धाक आणि प्रलोभन दाखवली नाही. तर ती स्वतः हून जनतेच्या इच्छेने भाजपात आली आहेत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.