‘चित्रा वाघ यांनी मला बलात्कारी म्हटले, माझी बदनामी केली’, मेहबूब शेख यांची पोलिसांत तक्रार

मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात एका युवतीने अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. औरंगाबाद पोलिसांत गुन्हा नोंद झाल्याने मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. मात्र, राज्य सरकारच्या मदतीने मेहबूब यांना पोलिसांनी मोकळीक दिल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने होत आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे असे सांगण्यात येतेय. पण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला अत्याचार प्रकरणावरून मेहबूब शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धारेवर धरले आहे.

त्यामुळे चित्रा वाघ शिरुर कासारमध्ये (जि.बीड) येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ १८ जुलै रोजी शिरुरमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते होते. यावेळी माझी बदनामी व्हावी या हेतूने त्यांनी मला अत्याचारी म्हटले तसेच माझ्यावर खोटे आरोप लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर येथील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि इतर कार्यकर्ते हजर होते. यावेळी चित्रा वाघ यांनी माझ्या बदनामीच्या उद्देशाने मी एका मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप केला. तसेच राज्य सरकार मेहबूबला अटक करत नाही असे म्हटले. वास्तविक माझ्यावर झालेल्या आरोपांसंबंधी पोलिसांनी तपास करुन तो गुन्हा निकाली काढला आहे. मात्र तरीही माझी बदनामी व्हावी, या उद्देशाने त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले आणि माझ्या बदनामीचा प्रयत्न केला’ असे मेहबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.

नेमके प्रकरण काय?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर सव्वा महिन्यापूर्वी औरंगाबादच्या तरुणीने अत्याचाराचे आरोप केले होते. दरम्यान, तांत्रिक तपासात शेख यांच्याविराेधात कुठलाही सबळ पुरावा हाती लागला नसल्याचा औरंगाबाद पोलिसांचा दावा आहे. यासंदर्भात विविध पक्षांसह संघटनांनी देखील योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, गुन्हा दाखल होऊन देखील मेहबूब शेख यांना अटक करण्यात आलेली नाही. यानंतर राजकीय पुढारी असल्याने पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप पीडितेने केला होता. यावरून तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. या प्रकरणात पिडीत महिलेची बाजू ऐकून घेत न्यायालयाने तपास करणाऱ्या पोलिसांवर ताशेरे ओढले होते.

महत्वाच्या बातम्या