उपराष्ट्रपती नायडूंच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला चीनचा आक्षेप, भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. यावर चीनने आक्षेप घेतला होता. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताचे राजकारणी नियमितपणे इतर कोणत्याही राज्याप्रमाणे अरुणाचल प्रदेशला भेट देतात. भारतीय नेत्यांच्या भारताच्या राज्याच्या दौऱ्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपाचं कारण समजण्यापलीकडे आहे, असं प्रत्युत्तर परराष्ट्र मंत्रालयाने चीनला दिले आहे.

भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या तथाकथित अरुणाचल प्रदेशला चीन मान्यता देत नाही आणि भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याला तीव्र विरोध करतो, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले होते. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने हे वृत्त दिलं होतं. अरुणाचल प्रदेशला चीनमध्ये झांगनान म्हणतात.

चीनच्या या आक्षेपावर भारताने तेवढेच सडेतोड उत्तर दिले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ‘भारताच्या एका राज्यात देशाचे एक नेते गेल्यावर चीनचा आक्षेप अनावश्यक आणि भारतीय नागरिकांना समजण्यापलीकडे आहे. आम्ही चीनच्या अधिकृत प्रवक्त्याकडून आलेले निवेदन पाहिले आहे. आम्ही अशी वक्तव्ये फेटाळतो. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे.’

नायडू ९ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले होते. चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेटचा भाग मानतो. दोन्ही देशांत ३,५०० किमी लांब सीमा आहे. सीमावादामुळे दोन्ही देशांत १९६२ मध्ये युद्धही झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या