भूतानमध्ये चीनकडून घुसखोरीची हद्द; चक्क एक गावच वसवले!

bhutan

थिंफु: सध्या जगभरामध्ये चीनमधून आलेल्या विषाणूने थैमान घातले आहे. त्याचबरोबर चीनच्या आक्रमक विस्तारवादामुळे संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. चीनकडून शेजारच्या देशांच्या भूभागांवर आणि समुद्राच्या हद्दीवरही दावा सांगण्यात येतो. चीनच्या घुसखोरीचे आणखी उदाहरण समोर आले असून भूतानच्या हद्दीत चीनने एक गावच वसवले आहे.

डोकलामजवळ हे गाव आहे. भारतासाठी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भारत आणि चीन दरम्यान या २००७ मध्ये डोकलाममध्ये तणाव निर्माण झाला होता. चीनच्या सीजीटीएन वृत्तवाहिनीचा वरिष्ठ पत्रकार शेव शिवई याने चीनने या भागात किती विकास केला आहे हे दाखवण्यासाठी काही फोटो पोस्ट केले. मात्र, या फोटोंमुळेच चीन अडचणीत आला आहे. शेन दावा विकासाचा दावा करत असलेला भूभाग हा भूतानच्या सीमेत येतो.

शेन यांनी गुरुवारी एका गावाचा फोटो शेअर केला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, हा डोकलामचा भाग आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हे गाव भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेल्या डोकलामपासून फक्त ९ किमी दूर आहे. शेन यांनी पांगडा गावाचा नकाशाही शेअर केला. हा भूभाग भूतानच्या सीमेपासून दोन किमी आत आहे. शेन यांनी हे ट्विट डिलीट केले. तर, दुसरीकडे ओपन इंटेलिजेंस सोर्स detresfa ने एक इमेज शेअर केली असून गाव वसवले गेले असल्याचा दावा केला आहे. चीनने या भागात मागील वर्षापासूनच बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. भूताननेही मात्र याबद्दल अधिकृत भूमिका मांडलेली नाहीय.

चीन हळूहळू अशा प्रकारची पावले उचलून आपल्या सीमा विस्तारत आहे. तर, दुसरीकडे भूतानच्या क्षेत्रीय अखंडतेच्या मुद्यावर भारताकडून चिंता व्यक्त केली जात आहे. डोकलाम जवळ चीनच्या वाढत्या हालचालींमुळे लडाखमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. डोकलाम हा भाग भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. २००७ मध्ये भारत-चीनच्या सैन्यात जवळपास ७० दिवस तणाव निर्माण झाला होता. तर कोरोना काळामध्ये देखील भारत-चीन सीमेवर दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात तणावाचे वातावरण असताना चीनने नेपाळचा १५० हेक्टरचा भूभाग बळकावला असल्याचा आरोप करण्यात येत होता. मे महिन्यात चीनने नेपाळची हा भूभाग बळकावण्यास सुरुवात केली. चीनने आपले लष्कर या भागात तैनात केले होते. चिनी सैन्याने लिमी खोरे आणि हिल्सा भाग ओलांडून दगडी सीमा खांबांना हटवले. त्यानंतर हा भाग आपला असल्याचे सांगत चीनने या ठिकाणी लष्करी तळ उभारण्यास सुरुवात केली.

महत्वाच्या बातम्या