शेजारणीसोबत भांडण झाल्याने दोन मुलांसह महिलेची इमारतीवरून उडी, दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

औरंगाबाद : बजाजनगर येथील जिजामाता हौसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने तिच्या दोन चिमुकल्यांसह इमारतीवरून उडी घेतल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यात, चौदा महिन्याचा मुलगा जागीच ठार झाला, तर महिला आणि तीन वर्षीय मुलीला वाचविण्यात यश आले आहे. अनिता सतीश अतकर वय २३ असे महिलेचे नाव आहे.

सोलापूर येथून कामानिमित्त वाळूज येथे स्थायिक झालेले सतीश नागनाथ अतकर हे पत्नी आणि मुलांसह बजाजनगर येथील जिजामाता हौसिंग सोसायटीमध्ये मागील काही महिन्यांपासून राहत आहे. वडगाव येथील एका एजन्सीवर काम करतात. सोमवारी दुपारी त्यांच्या पत्नी अनिता हिचे शेजारील महिले सोबत वाद झाला. त्याचाच राग मनात धरत अनिताने दोन चिमुकल्यासह राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली.

हा प्रकार तिथे असलेल्या काही लोकांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ धाव घेत तिघांना रुग्णालयात नेण्यासाठी हालचाल केली. मात्र, चौदा महिन्याचा सोहम हा जागीच ठार झाला. तर अनिता आणि तिची मुलगी प्रतीक्षा या दोघींना गंभीर इजा झाली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या