धक्कादायक : मुले चोरीची अफवा ; जमावाच्या मारहाणीत गुगलच्या इंजिनिअरचा मृत्यू

blank

टीम महाराष्ट्र देशा : मुलं चोरी होण्याच्या अफवांवरून जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण दिवसे न् दिवस वाढू लागले आहे. मॉब लिंचिंगमुळे कर्नाटकातील बिदरमध्येही एका गुगलच्या इंजिनीअरला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुले पळविण्यास आल्याच्या संशयावरून बिदर जिल्ह्याच्या औराद तालुक्यातील मुरकी गावात एका प्रवाशाची हत्या करण्यात आली, तर दोघांना जखमी केले. मृताचे नाव मोहम्मद आझम व जखमींची नावे तेल्हा इस्माइल व मोहम्मद सलमान अशी आहेत. हे तिघेही हैदराबादचे होते. मोहम्मद बशीर या मित्रासोबत हे तिघेही बशीरच्या औराद तालुक्यातील मुडीरका गावी मोटारीने जात होते. दरम्यान, मारहाणीत मृत्युमुखी पडलेला मोहम्मद आझम हा गुगलचा इंजिनिअर आहे.

बिदरच्या मुरकी येथे राहणाऱ्या बशीर, सलमान आणि अकरम या तीन मित्रांना भेटण्यासाठी मोहम्मद बिदरला आला होता. मित्रांचा निरोप घेत असताना त्यातील एका मित्राने काही लहान मुलांना चॉकलेट वाटायला सुरुवात केली. त्याचवेळी व्हॉट्सअॅपवर मुलं चोरी झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र जमून या चारही जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात मोहम्मद आझमचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. यापैकी काही प्रकार सोशल मीडियातील अफवांमुळे घडल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी