fbpx

‘महानेट’साठी खाजगी नेटवर्कच्या वापराची सूचना – देवेंद्र फडणवीस

मुंबई : केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनोज सिन्हा यांच्याशीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली. केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या भारतनेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात महानेट प्रकल्प उभारण्यात येत असून त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या गतिमान कार्यवाहीसाठी खाजगी कंपन्यांचे फायबर नेटवर्क आणि बँडविड्थ वापरण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना केली.

अशा प्रकारचा प्रस्ताव प्रथमच आला असून त्यासंदर्भात विचार करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊन उचित कार्यवाही केली जाणार आहे. खाजगी कंपन्यांचे फायबर नेटवर्क असणाऱ्या भागात त्यांचे नेटवर्क वापरण्याबरोबरच इतर भागात सरकारकडून नेटवर्कची उभारणी केल्यास या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कालावधीत निम्म्याने घट होणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींबरोबरच महसुली गावे, शाळा, आरोग्य केंद्र, बाजार, शेती आदी ठिकाणी गतीने नेटवर्क पोहोचून त्यांना निश्चित फायदा होईल.

त्याचबरोबर महाराष्ट्राने केलेल्या उल्लेखनीय बाबींची माहिती माध्यमांना देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्याने स्वच्छ महाराष्ट्राचे लक्ष्य वेळेआधी पूर्ण केले आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि महसुली गावासह बहुतांश वाड्या-पाड्यापर्यंत वीज पोहोचविण्याचे काम झाले आहे. आता उर्वरित प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचविण्याचे लक्ष्य वर्षभरात पूर्ण करण्यात येईल.