नाना पटोलेंची जागा भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची शोधमोहीम

NANA-FADNAVIS

नागपूर: नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोधमोहीम सुरू केली असून रविवारी ‘रामगिरी’ येथे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची बैठक घेत आढावा घेतला.

नाना पटोले यांनी गेल्या ७ डिसेंबरला लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता काही महिन्यांनी लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील ‘रामगिरी’ निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी आमदारांनी पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. आगामी पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ज्येष्ठ व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उमेदवार ‘आयात’ धोरणावर विचार करू नये, असे मत व्यक्त केले. तसेच टोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात भाजपाला कितपत नुकसान झाले याचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. पटोले यांचा फक्त साकोली विधानसभा मतदारसंघात काहिसा प्रभाव आहे. मात्र, तेथेही भाजपाचे कार्यकर्ते मागे हटणार नाहीत असे आमदारांनी सांगितले.

या बैठकीला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार काशीवार, भाजपचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष तारीक कुरेशी यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.