मुख्यमंत्र्यांच्या संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीचा – खा.अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकींच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोप, सवाल-जवाब होत असतात पण सध्या भाषणांमध्ये बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्र्यांनी संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर आणला असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले असून विरोधकांना कुत्रे संबोधून अत्यंत हीन पातळीवरचा संवाद केला आहे. त्यामुळे या सुसंस्कृत महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यावेळी खा.अशोक चव्हाण म्हणाले की , ‘महाराष्ट्राला समृद्ध राजकीय सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा आहे. अनेक राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राला वैचारिक वारसा दिला असून अनेक थोर नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. पण आतापर्यंत राजकीय संवादाचा स्तर इतका कधीही ढासळू दिला नव्हता. विरोधक हे लोकशाहीमधील महत्त्वाचा घटक आहेत आणि त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे याची जाणिव आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांना होती. परंतु राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा ही सुसंस्कृत व पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही हे या अगोदरही अनेकवेळा दिसून आले होते’.

आता याच्याही खालची पातळीवर जाऊन त्यांनी विरोधकांना कुत्रे म्हणून संबोधले आहे. पराभवाच्या भीतीतून मुख्यमंत्र्यांचे खरे चरित्र समोर येऊ लागले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने अशा विचारांना कधीच स्थान दिले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.