मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार होणार आमदार ?

लातूर : निवडणुकीचा फड रंगात येत असताना वेगवेगळ्या पक्षाकडून नवनवीन उमेदवारांची नावे पुढे येताना दिसतात.त्यात खासकरून पक्षाच्या नेत्यांच्या जवळची, नात्यातली मंडळी असतात. येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीतही अशी बरीच नावे पुढे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभीमन्यु पवार हे औसा विधानसभा मतदार संघातून मोर्चे बांधणी करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसातच अभिमन्यू पवार यांचे नाव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आले आहे. विकासकामांचा धडाका लावत आपल्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी त्यांनी जमवायला सुरवात केली आहे.

सुरुवातीला लातुर ग्रामीण मधून तयारीला लागलेल्या पवारांनी आता मात्र औसा विधानसभेवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. लातूर ग्रामीण देशमुख परिवाराचा गड मानला जातो, त्याभागात असलेल्या त्यांच्या कारखान्यांमुळे शेतकरी वर्ग त्यांना मोठ्या प्रमाणात जोडला गेलेला आहे.त्यामुळे तिथे गेल्या निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेचाही निभाव लागू शकला नाही. त्या कारणानेच पवार औसा विधानसभा मतदारसंघाकडे वळले असल्याचे बोलले जात आहे. अभिमन्यू पवारांनी जरी हा मतदार संघ निवडला असला तरी या ठिकाणचा मार्ग त्यांना म्हणावा तितका सोपा नाही.

औसा विधानसभा मतदारसंघात गेल्या २ निवडणुकीत प्रमुख लढत कॉंग्रेसचे विद्यमान आमदार बसवराज पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्यामध्ये झाली होती. आमदार बसवराज पाटील येण्यागोदर या मतदार संघाचे १० वर्ष प्रतिनिधित्व शिवसेनेचे दिनकरराव माने यांनी केले आहे. मात्र मागील काही दिवसांमध्ये ते जिल्ह्याच्या म्हणता तालुक्याच्या राजकारणापासून थोडेसे लांब राहिलेले आहेत.

येणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्चित मानली जात असल्यामुळे माजी मंत्री असलेले कॉंग्रेसचे विद्यमान आमदार बसवराज पाटील हेच उमेदवार असल्याचे बोलले जात आहे.मात्र युतीचा निर्णय अद्याप स्पष्ट नाहीये.पण जर का मुख्यमंत्र्यांनी स्वीय सहाय्यकांसाठी ही जागा भाजपकडे घेतल्यास औशात पाटील विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळू शकतो. अभिमन्यू पवारांनी तशी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. नुकताच त्यांनी औशात भव्य शेतकरी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केले आहे. जर युती झाली नाही तर औशात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना असा तिहेरी सामना रंगण्याची शक्यता आहे.