औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लक्ष; अब्दुल सत्तारांची माहिती

abdul sattar

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष ठेवून आहेत. झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री दररोज आढावा घेत असून शेतकऱ्यांनी चिंता करू नये. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानीची महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला. दरम्यान रविवारी ( दि.१२ ) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील विविध गावात शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार याप्रसंगी म्हणाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील बऱ्याच मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी साचले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या मूग, उडीद, सोयाबीन,तूर, कापूस या पिकांना मोठा फटका बसला असून फळपीकही उध्वस्त झाले आहे. जनावरे, रस्ते, पूल तसेच घरांचीही पडझड झाली असून महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणांनी तातडीने पंचनामे करावे. जेणे करून तंतोतंत नुकसानीची माहिती समोर येईल. पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदती बाबत घोषणा करतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. यावेळी वैजापूर चे आमदार प्रा. रमेश बोरणारे, माजी आ. नितीन पाटील आदींसह वैजापूर, कन्नड, खुलताबाद, गंगापूरचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध गावातील सरपंच व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या