वाधवान प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज, राज्य सरकार संशयाच्या फेऱ्यात

udhav thakare

मुंबई : वाधवान प्रकरणानंतर राज्य सरकार चर्चेच्या केंद्र स्थानी आले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे. मात्र या साऱ्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत, या प्रकरणाशी संंबंधित असणारे अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यास उशीर का लावला असा सवाल उपस्थित केला आहे.

याबाबत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी देखील बातचीत केली. दिवाण बिल्डरशी संबंधित बड्या लोकांना, लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वरला जाण्याची लेखी परवानगी गुप्ता यांनीच दिल्याचं कळताच उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी शरद पवार यांच्याकडे नोंदवली होती. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं होतं. पण, त्याला उशीर केला गेला. स्वाभाविकच, सरकारच्या भूमिकेबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्विग्न झाल्याचं कळतं.

दरम्यान राज्यातून कोणालाही बाहेर जायचे असेल किंवा जिल्हा बदलायचा असेल तर त्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना होती, याची  कल्पना अमिताभ गुप्ता यांना होती. तरीदेखील त्यांनी स्वतःच्या अधिकारात वाधवान कुटुंबीयांना परवानगी दिली. ती देत असताना त्यात त्यांनी ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत असा उल्लेख केला. अधिकाराचा गैरफायदा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे यावर आता  मुख्यमंत्री ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याच ठरणार  आहे.