मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीला बोलावून आमची फसवणूक केली

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. २५ मार्च रोजी साष्टपिंपळगाव ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली होती. मात्र अजून पर्यंत आरक्षण मिळालेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीला बोलावून आमची फसवणूक केल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीदरम्यान २ दिवसांमध्ये लेखी आश्वासन देतो असे सांगितले. मात्र आज १५ दिवस लोटूनही शासनाकडून कुठल्याही प्रकारची हालचाल करण्यात आलेली नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केली आहे. अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

मराठा समाजातील तरुण आणि तरुणींकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे ते सुशिक्षित बेकारीत आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ७९ दिवसाहून अधिक अधिक कालावधी पासून साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थ उपोषण आणि ठिय्या आंदोलन करत आहे.

साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या अडीच महिन्यापासून ठिय्या आंदोलन सुरू असुन या आंदोलनाची दखल शासनाने घेऊन मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या