मुंबईतील आपत्कालीन स्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली

devendra-fadnavis-and-modi

मुंबई  : मुंबई तसेच परिसरात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि शासकीय यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना दिली .

केंद्र शासन राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत दिले आहे. आपत्तीग्रस्तांच्या मदत आणि बचावकार्यासाठी गृह मंत्रालयाकडून एनडीआरएफ दलाच्या तुकड्या यापूर्वीच पाठवण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मुंबई एन्ट्री पॉईंट्स आणि सागरी सेतू येथील पथकर वसुली थांबविण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षामार्फत विशिष्ट परिसरातील पाण्याच्या स्थितीबाबतही वेळोवेळी माहिती देण्यात येत आहे. अतिवृष्टीमध्ये जनतेच्या मदतीसाठी शासकीय यंत्रणा सर्व आवश्यक प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे स्वंयसेवी संस्था आणि नागरिक स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी एकत्र येत आहेत, याचे समाधान असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.