मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचे पहिल्यांदाच सकारात्मक विधान

local and uddhav thackeray

मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घालून दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिन्याभरापासून जोर धरू लागली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असं म्हटलं होतं. तर, लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्या अशी सूचना एका याचिकेच्या सुनावणी वेळी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. अद्यापही लोकलबाबत कोणताही निर्णय झाला असून आता एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे आईनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

‘महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचं बंद राहील,’ असं ठाकरे म्हणाले.

यासोबतच, ‘लोकल सुद्धा कधी सुरू होणार? असं विचारलं जात आहे. त्याच्यावरही विचार सुरू आहे. काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील,’ असं देखील त्यांनी म्हटलं. मुंबईतील एच पश्चिम विभागामधील वॉर्ड ऑफिसच्या इमारतीत झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पालिका अधिकाऱ्यांचा आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी वरील विधान केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या