मुख्यमंत्री ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्तांशी साधणार संवाद

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दि. २६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याला भेट देणार आहेत. या ठिकाणी अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले असून मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे पाटण या तालुक्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सोबतच येथील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

पाटण या ठिकाणी पुरस्थितिमुळे परिस्थिती बिघडली आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून नागरिकांसाठी जिल्हा परिषद शाळेत तात्पुरती राहण्यासाठी छावणी उभारली आहे.या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. या भागाचा दौरा करून मुख्यमंत्री ठाकरे येथील परिस्थितीचा आढावा घेतील.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सकाळी १०:४५ वाजता पुण्याहून हेलिकॉप्टरने कोयनानगरकडे रवाना होणार आहेत. तसेच येथील जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या छावणीला भेट देऊन ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या भागातील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार आहेत.

आढावा घेऊनच नुकसान भरपाई जाहीर करणार
‘केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल,’ असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रविवारी चिपळूण येथे सांगितले. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

महत्त्वाच्या बातम्या