‘मुख्यमंत्री साहेब, ढोंगबाजी बंद करून, मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर आधी कारवाई करा’

atul bhatkhalkar

मुंबई: सामनाचा आजचा मथळा आणि ठाकरे सरकारची कर्म यात कोणताही समान धागा नाही. संजय राऊत सामनात म्हणतात की, नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी. अहो मुख्यमंत्री साहेब किती हा ढोंगीपणा. असा सवाल करत संजय राठोड, धनंजय मुंडे यांच्यावरील महिला अत्याचार करण्याचा आरोप असून त्यांच्यावर आधी कारवाई करा अशी मागणी भाजपचे अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘परप्रांतीयांची नोंद करा’ असे आदेश राज्यातील पोलीस प्रशासनाला दिले आहेत. साकीनाका प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. मंत्रिमंडळात आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे, आपल्या पक्षाचे नेते संजय राठोड हे परप्रांतीय आहेत का? असा सवाल करत त्यांनी संजय राठोडचे काय झाले? त्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करावा लागला.नंतर तिला आत्महत्येला प्रवृत्त केले गेले. त्याचा अजून तपास होत नाही. करुणा शर्मा प्रकरण यात धनंजय मुंडे यांनी स्वतः मान्य केले की, माझे तिच्याशी संबंध आहेत. आणि दोन अपत्ये आहेत. पण आज त्या तुरुंगात आहेत. राष्ट्रवादीचे मेहबूब शेख बलात्काराचा आरोप असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही, या सर्व महाराष्ट्राच्या माता-भगिनी आहेत. तुम्ही शक्ती कायदा आणत नाहीत, कारण तुमच्याच मंत्री मंडळातील नेते महिलांच्या रक्षक ऐवजी आज भक्षक बनले आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री साहेब तुमचा ढोंगीपणा आता बंद करा. तुमचा सुसंकृतपणाचा चेहरा आता टराटरा फाटलेला आहे. त्यामुळे ढोंगबाजी बंद करून, मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर आधी कारवाई करा. अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘परप्रांतीय नोंद करणे’ या आदेशामुळे समाजात तेढ निर्माण केला असा आरोप करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या