मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा- अशोक चव्हाण

fadnavis-ashok chavan

टीम महाराष्ट्र देशा: धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जमीन दिली होती मात्र जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या एका २५ वर्षीय विद्यार्थाने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शेतक-यांनंतर सुशिक्षित बेरोजगार ही मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करू लागले आहेत. सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देऊन पायऊतार व्हावे. अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील पाटील यांची पाच एकर जमीन औष्णिक वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. परंतु, आंब्याची झाडे व अन्य शेती उत्पादने घेणारी सुपिक जमीन असतानाही केवळ चार लाख रुपयेच मोबदला देण्यात आल्याने ते अत्यंत नाराज होते. वाढीव मोबदल्यासाठी अनेक महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडे खेटे मारूनही काही होत नसल्याने त्यांनी गेल्या सोमवारी निर्धारपूर्वक मंत्रालय गाठले होते. तिथेही पदरी निराशाच आल्याने त्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. तसेच आज (बुधवार) अहमदनगरचा अविनाश शेटे या विद्यार्थाने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर अविनाशनं कंटाळून आज (बुधवार) मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून पोलिसांनी अविनाशला वेळीच ताब्यात घेतल्यामुळे त्याला कोणतीही इजा झाली नाही. मात्र या प्रकरणावरून मंत्रालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.