मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा

मुंबई : राज्यातील समृद्धी महामार्ग, रेल्वे प्रकल्प, मेट्रो, सिंचन प्रकल्प आदी विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेऊन या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश संबंधिताना दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पांचा आढावा आज सह्याद्री अतिथीगृहात घेतला. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थित होते.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी 3) अंतर्गतच्या नवीन ऐरोली-कळवा कॉरिडॉर व नेरूळ, बेलापूर, सीवूड-उरण रेल्वे मार्गाच्या कामांचा आढावा घेतला. नेरूळ-बेलापूर-उरण मार्गावरील पहिल्या टप्प्यातील तीन रेल्वे स्थानकांची कामे ही जून 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण मार्गातील पाच स्थानकांची कामे डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.राज्यातील वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्ग, वडसा गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामांचा आढावा घेऊन ही कामे वेगाने करून ती ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या दहा पैकी सात रेल्वमार्गावरील उड्डाणपुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये नाशिकमधील ४, जळगावमधील दोन, नागपूरमधील एका पुलाचा समावेश आहे. उर्वरित तीन उड्डाणपुलांची कामे ही डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेट्रो मार्ग दहिसर ते डी.एन.नगर (2 ए), डी.एन.नगर ते मंडाळे (2 बी), मेट्रो मार्ग वडाळा ते कासारवडवली (मार्ग क्र.4), स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (मार्ग क्र 6) आणि दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) या मार्गाच्या कामांच्या प्रगतीचा व येणाऱ्या अडचणींचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. मेट्रो तीन च्या सुमारे 2.7 किमी भुयारी मार्गाचे काम झाले असून 27 पैकी 25 मेट्रो स्थानकांची कामे सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.