मराठा आरक्षणाच्या निकालावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद  

टीम महाराष्ट्र देशा : हायकोर्टाने आज (गुरवार) जो निकाल दिला आहे ते आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निकालानंतर विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी निकालाचे अवलोकन केले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आणण्यासाठी दोन्ही सभागृहाने साथ दिली, त्याचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे. मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात आलेले आरक्षण हे घटनेच्या बाहेर नसून ते वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यात शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी ३० नोव्हेंबर, २०१८मध्ये राज्य सरकारने कायदा मंजूर केला होता. या कायद्याला विरोध करणाऱ्या तर काही सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. आज या याचिकांवर उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

राज्य सरकारला १०२च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे. असे न्यायालयाने म्हटले. इतकेच नव्हे तर आयोगानुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५० टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचेही न्यायालयाने म्हंटले आहे.  याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण सुरु राहील परंतु १६ टक्के नाही, असेही न्यायालयाने म्हंटले. नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण वैध आहे. परंतू  १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल, असे न्यायालयाने म्हंटले आहे.