मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलीप सोपल यांच्या पाठीशी – राजेंद्र मिरगणे

बार्शी : शब्दाला पक्के, युतीधर्माचे पालन करणारे विश्वासू व्यक्तीमत्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त आणि फक्त भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्याच पाठीशी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर अपक्ष उमेदवाराकडून केला जात असल्याने मतदारांनी सावध रहावे, असे स्पष्टीकरण महाहौसिगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी व्यक्त केले.

पानगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रगतशिल शेतकरी रामभाऊ मोरे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, भाजपा तालुकाध्यक्ष बिभीषन पाटील, संगमेश्वर भडुळे, शिवाजी पवार, पंडीत मिरगणे, राजेंद्र महाडीक, सुधीर काळे, आण्णासाहेब कापसे, दत्ताआण्णा काळे, अशोक काळे, चेतन मोरे, शहाजी कापसे, काकासाहेब देशमुख, अंकुश भिसे, लाला मोरे, िपंटू नाईकवाडी, संपत वाघमारे, विजयबप्पा पाटील, उत्तम लोहार, काका कानगुडे, रशीद शेख, सौदागर जमदाडे, तानाजी चव्हाण, आण्णा मोरे, धन्यकुमार मोरे, नागनाथ गायकवाड, अमोल वाणी, संभाजी आगलावे, अमोल ओव्हाळ आदी उपस्थित होते.

राजेंद्र मिरगणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या सहअध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्याबरोबरच बार्शी तालुक्यातीलही घर नसलेल्या प्रत्येक बेघरांस हक्काचे पक्के घर देण्यासाठी आपण वचनबध्द आहोत. भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार गरिबांच्या हिताचा विचार करत असून बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांनाच विजयी करा.

आगळगावच्या सभेत विरोधातील अपक्ष उमेदवाराने बार्शीकर जनतेची दिशाभुल करणारी फसवी आणि खोटी आश्वासने दिली आहेत. त्यांनी अगोदर आमदारकीच्या आणि २५ वर्षाच्या राजकारणात तालुक्यासाठी ठोस काय केले ते सांगावे. बार्शी तालुक्यासाठी विकासनिधी मुख्यमंत्री महोदयांनीच दिला आहे. वेगवेगळ्या लोक कल्याणकारी योजनांसाठी ते सदैव बार्शीकरांच्या पाठीशी असून, त्यामागे माझा सततचा पाठपुरावा कारणीभूत आहे.

परंतु त्याचे कधीही श्रेय घेत नाही. कोकणात अतिवृष्ठीमुळे वाहून जाणारे १६७ टिएमसी पाणी मुख्यमंत्र्याच्या कल्पककतेमधून महत्वांकाक्षी योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळणार आहे. त्यापैकी १२ टिएमसी पाणी बार्शी तालुक्यासाठी मिळावे यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून बार्शीतील विविध रस्त्यासाठी कोट्यावधींचा निधी मिळाला, उपजिल्हा रूग्णालय निर्मितीला मंजूरी मिळाली. लवकरच वैरागमध्ये ग्रामीण रूग्णालय होणार आहे. बार्शी तालुक्याच्या विकासाऐवजी अपक्ष उमेदवार राऊत यांनी आपल्या सत्ताकेंद्राच्या माध्यमातून केवळ स्वत:च्या कुटूंबियांचा विकास करण्याचे काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या