घाटकोपर दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

घाटकोपर दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुंबई : घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल; कोणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रात्री उशिरा घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेची पाहणी केली. पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता व खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून दुर्घटनेबाबतची माहिती घेतली. शिवाय स्थानिक रहिवाशांशी या घटनेबाबत संवाद साधून माहिती जाणून घेतली.

मुख्यमंत्री म्हणाले, दुर्घटनेबाबत बचावकार्य सुरु राहील. जखमींवर आवश्यक ते उपचार सुरु आहेत. त्यांना हवी ती मदत शासन करीत आहे. दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यांना 15 दिवसांत अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

यावेळी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकाऱ्यांशीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दुर्घटनेबाबत चर्चा केली तसेच बचावकार्याबाबत सूचना केल्या.

You might also like
Comments
Loading...