मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लेडीज बार’चे मालक?

टीम महाराष्ट्र देशा – मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोणतीही पडताळणी न करता पालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लेडीज बार आणि आयुक्त अजोय मेहता यांच्या नावे हुक्का पार्लरचं नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलं आहे.

महापालिकेने इज ऑफ डुइंग बिजनेसच्या अंतर्गत दुकाने आणि अस्थापना विभागातून ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना लवकरात लवकर नोंदणी प्रमाणपत्र मिळावे या हेतूने ही सुविधा देण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून कोणतीही पडताळणी न करता नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याने पालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

त्याचा परिणाम म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लेडीज बारची नोंदणी झाली आहे. तर महापालिका आयुक्त अजोय मेहतायांच्या नावाने ‘हुक्का पार्लर’चे नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या नावाने बारचं नोंदणी प्रमाणपत्र देताना त्यावर वर्षा निवासस्थान, मलबार हिल असा कार्यालयीन पत्ता दिला आहे.

दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनीही ही चूक झाल्याचं मान्य केलंय. व्यक्तिचं नाव, पत्ता, व्यवसायाचं स्वरुप, इमेल, पॅन कार्ड नंबर बघूनच त्याला नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात येत असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं.