कॅनडा व अमेरिकेचा दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल

मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम व प्रकल्पांना गती देण्यासाठी कॅनडा व अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नवी दिल्ली येथील निती आयोगाच्या बैठकीस उपस्थित राहून सायंकाळी ६.४५ च्या सुमारास मुंबईत परतले.

९ जून रोजी मुख्यमंत्री शिष्टमंडळासह कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्याकरिता रवाना झाले होते. या दौऱ्यात त्यांनी दुबई येथील डीपी वर्ल्ड समूह, थुम्बे समुह, कॅनडा येथील बॉम्बार्डिअर, क्युबेकमधील इन्स्टिट्युट ऑफ डाटा व्हॅलोरायझेशन (आयव्हीएडीओ), अमेरिका येथील ब्लूमबर्ग, विर्जिन हायपरलूप, जागतिक बँक आदी कंपनीच्या प्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी भेट घेऊन राज्यातील विविध प्रकल्पांबाबत चर्चा केली.

दरम्यान आज रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे नवी दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर ते निती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाले. सायंकाळी ६.४५ च्या सुमारास त्यांचे नवी दिल्ली येथून मुंबई येथे आगमन झाले.

Comments
Loading...