अराजकता माजवण्यासाठी संपूर्ण शेतकरी कर्जमाफीची मागणी : मुख्यमंत्री

मुंबई : केवळ अराजकता माजवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची आंदोलकांकडून मागणी केली जात असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षासह सुकाणू समितीवर देखील चांगलेच बरसले.

मुंबई येथे सुरु असणाऱ्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकत , पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळाले. मुख्यमंत्र्याच्या भाषणात टीकेचा रोख विशेषत: शेतकरी सुकाणू समितीवर होता. सुकाणू समितीचा उल्लेख ‘जीवाणू’ समिती करत मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीवर चांगलच तोंडसुख घेतलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?
जे लोक निवडूनही येऊ शकत नाहीत ते लोक या समितीत आहेत. पण त्यांना कधी विरोध केला नाही. मात्र संपूर्ण कर्जमाफीची मागणी करून यांना अराजकता माजवायची आहे. त्यांना फक्त लोकांना झुंजवत ठेवायचं होतं. १५ ऑगस्टला झेंडा फडकवण्यास विरोध करणारे हे देशद्रोही असून मला कोणाची औकात काढायची नाही असा टोलाही लगावला .या शेतकरी आंदोलनामागे केवळ राजकीय हेतू होता, असा आरोप त्यांनी केला.