सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

सातारा : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच महाराष्ट्रात पुरोगामित्वाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यामुळेच राज्याला पुरोगामी म्हणून ओळख मिळाली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरच वाटचाल करू असे सांगत सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नायगाव या त्यांच्या जन्मगावी महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

सुरूवातीला नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन करून पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पाहणी केली. त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते.

यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार मनिषा चौधरी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील,जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, नायगावचे सरपंच निखील झगडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात परिवर्तन आणले. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षणात भरीव कामगिरी करून त्यांनी सनातनी समाजाला सणसणीत उत्तर दिले. आज या गोष्टी सोप्या वाटत असल्या, तरी त्या काळी या गोष्टी खूप कठीण होत्या. हे कार्य करताना समाजाचा मोठा रोष त्यांना सहन करावा लागला.

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजातील वंचितांपर्यंत विकास आणि महिलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम यशस्वीपणे केले. त्यांनी महिलांसाठी आणि विधवांसाठी मोठा लढा उभा केला. समाजातील वंचित घटकांच्यामागे उभे राहण्याचे काम या दाम्पत्याने केले. जातीभेद मिटविण्यासाठी तसेच स्त्रीमुक्तीसाठी मोठा लढा त्यांनी उभा केला. महात्मा फुलेंच्या कामाची प्रेरणा घेऊनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचे काम केले.

महिलांच्या मुक्तीसाठी आयुष्य घालवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या नायगावला ‘ब ‘दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री म्हणाले,नायगावमध्ये ‘सावित्रीसृष्टी’ उभारणीसाठी मान्यता देऊ. तसेच पुणे शहरातील ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारणीचा प्रश्न कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. मात्र सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्मारक उभे करण्याचे काम सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची क्षमता लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, नायगाव ते मांढरदेवी हा रस्ताही लवकरच करण्यात येईल. नीरा-देवधर धरण लाभक्षेत्रातील योजनांची कामे मार्गी लावून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवू. तसेच लिफ्ट इरिगेशन प्रकल्पांची 81 टक्के वीज बिले सरकार भरणार आहे, तर केवळ 19 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. त्यामुळे वीज बिलाअभावी कोणतीही लिफ्ट इरिगेशन योजना बंद पडणार नाही.

देशातील महिला व वंचितांसाठी फुले दाम्पत्याने भरीव काम केले आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून राज्य सरकार याविषयी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगत संत सावता माळी यांचे जन्म गाव असणाऱ्या अरणचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून तेही काम वेगाने मार्गी लावणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आर्या देशपांडे,जनाबाई हिरवे, यशस्वी साळुंखे आणि प्रांजल साळुंखे या मुलींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.