fbpx

चिदम्बरम कुटूंबियांच्या विरोधात आरोपपत्र

चेन्नई : माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम पुन्हा एकदा प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आलेत.परदेशातील मालमत्ता जाहीर न केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या वतीनं चिदम्बरम कुटूंबियांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पी. चिदम्बरम, यांच्यासह त्यांची पत्नी नलिनी, पुत्र कार्ती आणि स्नुषा श्रीनिधी यांच्याविरुद्ध काळा पैसा कायद्यान्वये आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

चेन्नईतील विशेष न्यायालयात प्राप्तिकर विभागाने आरोपपत्र दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नलिनी, कार्ती आणि श्रीनिधी यांच्यावर केम्ब्रिज येथील ५.३७ कोटी रुपयांची त्याचप्रमाणे त्याच देशांतील ८० लाख रुपयांची अमेरिकेतील ३.२८ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर न केल्याचा आरोप ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चिदम्बरम कुटुंबीयांनी सदर गुंतवणूक कर अधिकाऱ्यांकडे जाहीर केली नाही, त्याचप्रमाणे कार्ती चिदम्बरम हे सहमालक असलेल्या चेस ग्लोबल अडव्हायझरी या कंपनीची माहितीही दडविण्यात आली असून ते काळा पैसा कायद्याचे उल्लंघन आहे, असा दावा आरोपपत्रांत करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासात तर्कशुद्ध निष्कर्ष आल्याने आरोपपत्र दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्ती यांनी कायद्याचे उल्लंघन करून परदेशांत मालमत्ता जमविल्याचे उघड झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षी त्यांच्याविरुद्ध काळा पैसा कायद्यान्वये कारवाई सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने काळ्या पैशांविरुद्ध हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान २०१५ मध्ये त्याबाबत कायदा केला. कार्ती यांच्यावर खात्याने अलीकडेच बजावलेल्या नोटिशीला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.