छिंदमची ‘तो मी नव्हेच’ भूमिका; छिंदमला जामीन मंजूर

छिंदम कोणत्याही क्षणी जेलबाहेर येणार

अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जामीन दिल्यावर छिंदम केव्हाही कारागृहाच्या बाहेर येऊ शकतो.

दरम्यान, शुक्रवारीच १९ तारखेपर्यंत छिंदमच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. त्यामुळे छिंदमची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली.  छिंदमला जामीन मिळाला असल्याने त्याची केव्हाही सुटका होऊ शकते.

श्रीपाद छिंदमने शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर राज्यात सर्व स्तरावर छिंदमचा  निषेध करण्यात आला होता. त्यानंतर छिंदमने व्हिडिओ प्रसारित करुन माफीनामा मागितला. मात्र आता छिंदमने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली आहे. छिंदमने मी निर्दोष असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं अर्जात म्हटलं आहे. त्याचबरोबर, “मी घरातील एकमेव कर्ता पुरुष आहे. आई आजारी असून, दोन लहान मुले असल्यानं देखभालीसाठी जामीन मिळावा.”

छिंदम बाहेर आल्यास तपासावर दबाव आणण्याची आणि पुरावा नष्ट करण्याची शक्यता वर्तवली. त्याचबरोबर छिंदमच्या जीविताला धोका असून कायदा सुव्यवस्थेचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारी वकिलांनी जामिनाला तीव्र आक्षेप घेतला. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकूण जामीन मंजूर केला आहे. छिंदमवर वकिलांनी बहिष्कार टाकल्यानं त्यानं जामिनासाठी स्वतः अर्ज केला होता.