fbpx

छिंदमचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

Shripad Chhindam jpg

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १९ तारखेपर्यंत छिंदमचा मुक्काम कोठडीत असेल.

श्रीपाद छिंदम याला नाशिक कारागृहात हलवण्यात आलं होतं. आज त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. छिंदमची कोठडी १४ तारखेला संपत होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागून त्याला न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडी मागितली, मात्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडीत १० दिवसांची वाढ केली.

दरम्यान काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या खुर्चीचा शिवसेना कार्यकर्त्यांनी कडेलोट करून निषेध व्यक्त केला. अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदम जी खुर्ची वापरत होता तीला पालिकेच्या पायऱ्यांवरुन ढकलून तोडण्यात आली.

भाजपने त्याला उपमहापौरपदावरुन बडतर्फ केल्यानंतर नुकतेच शिवसेनेचे अनिल बोरुडे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. खुर्चीची तोडफोड करताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना छिंदमविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. छिंदमच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हाअहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. छिंदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.