शिवरायांचा अपमान करणारा छिंदम आणखी आठ दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

टीम महाराष्ट्र देशा- शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेला भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला आणखी आठ दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यापूर्वी पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते.

दरम्यान यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणारा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला राज्यातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी शिवसन्मान मोर्चा काढण्यात आला. महिला, मुलांसह मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी छिंदमच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

या गुन्ह्यात अटक केल्यानंतर छिंदमला जामीन मंजूर झाल्यानंतर छिंदम याच्या तडीपारीचा प्रस्ताव तोफखाना पोलिसांनी नगरच्या प्रांतधिकारी गाडेकर यांना पाठविला. हा प्रस्ताव मंजूर करून छिंदमला ३ ते १८ एप्रिलपर्यंत नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. हद्दपारीचा कालावधी संपल्यानंतर छिंदम नगरमध्ये आला होता. छिंदम नगरमध्ये राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून आठ दिवसांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तोफखाना पोलिसांना प्रातंधिकारी गाडेकर यांना दिला होता. हा प्रस्ताव प्रांतधिकारी गाडेकर यांनी मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हाअहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

You might also like
Comments
Loading...