राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेला छत्रपती उदयनराजेंची दांडी !

Udayanraje_Bhosale

पुणे: खासदार छत्रपती उदयन राजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल सभेला दांडी मारली. पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल सभेची सांगता आणि पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीने आज पुण्यात भव्य हल्लाबोल सभा घेतली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि खासदार छत्रपती उदयन राजे भोसले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाराजी आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा उदयन राजेंवर टीका केली होती. त्यानंतर उदयन राजे भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले होते. आज पक्षाच्या वर्धापन दिनाला उदयन राजे आले नसल्याने त्यांची नाराजी उघड झाली आहे.

दरम्यान, आज हडपसर येथे एका कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खासदार उदयन राजेंचे गुणगान गायले. त्यामुळे उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आज आपला २० वा वर्धापन दिवस देखील साजरा करत असल्याने आजच्या सभेला विशेष महत्व आहे. जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते सभेला संबोधित करणार आहेत.  विशेष म्हणजे जेलमधून सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच जेष्ठ नेते छगन भुजबळ हे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.