छत्रपतींची उंची कमी कराल तर याद राखा- धनंजय मुंडे

dhananjay munde and narendra modi

नागपूर   – ‘छत्रपतींचा आर्शिवाद चलो चले मोदीं के साथ’ अरे इथे सुध्दा बदललात… इथेसुध्दा तुम्हाला वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करावी. हा छत्रपतींच्या सर्व अनुयायांचा हा अपमान असून हा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि अश्वारुढ पुतळयाची एक इंचही उंची आम्ही कमी होवू देणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेमध्ये सरकारला दिला.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाची उंची कमी करण्याचा मुद्दा औचित्याच्या मुद्दयाद्वारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी सरकारने उंची कमी करण्यासाठी दिलेले धक्कादायक कारणही सभागृहासमोर मांडले.

शिवाजी महाराजाच्या अश्वारुढ पुतळयाची उंची नोंद आराखडयापेक्षा कमी करण्यात आली आहे. नवीन आराखडयामध्ये शिवाजी महाराजांच्या जिरे टोपापर्यंतची उंची ही १२१.२ मीटर एवढी होती ती आता ७५.२ इतकी कमी करण्यात आली आहे. ही कमी झालेली उंची भरुन काढण्यासाठी तलवारीची उंची ६८ मीटरवरुन ४५.५ मीटरपर्यंत करण्यात आली आहे. अरे काय चालले सरकारचे असा संतप्त सवालही सरकारला धनंजय मुंडे यांनी केला.

एकीकडे सदनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, युगपुरुषांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होणार असे सांगायचे आणि दुसरीकडे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची उंचीच कमी करायची आणि उंची कमी करण्यासाठी कारण काय दिले हे महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला कळायला पाहिजे असेही मुंडे म्हणाले.
छत्रपतींच्या पुतळयाची उंची कमी करण्यासाठी पैशाचे कारण सरकारने दिले आहे. पैशाच्या कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची उंची कमी करताय का ? महाराजांच्या एकूण पुतळयाची उंची कमी करण्याची राज्यसरकारची काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

ही उंची कमी केल्यामुळे ३३८ कोटी ७४ लाख रुपये सरकारचे वाचणार आहेत. ३३८ कोटी रुपये वाचवण्यासाठी अरबी समुद्रातील छत्रपतींचे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पुतळयाची उंची कमी करणार असू तर हा महाराष्ट्राचाच नव्हे तर छत्रपतीं शिवाजी महाराजांचा हा अवमान आहे. तलवारीची उंची वाढवायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची पूर्वीची जी उंची आहे ती कायम राहिली पाहिजे. याबाबतीतही सरकार काय भूमिका घेणार आहे हे सरकारने स्पष्ट करावे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

हा छत्रपतींच्या सर्व अनुयायांचा हा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. छत्रपतींच्या पुतळयासाठी ३३८ कोटी नाही ४०० कोटी खर्च झाले तरी चालतील परंतु पूर्वीच्या जिरे-टोपापासूनची उंची कमी होणार नाही याची खात्री आणि ठाम उत्तर सरकारने दयावे अशी जोरकस मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीत कपात, मात्र तरीही जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार