छत्रपतींच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम मार्गी – चंद्रकांत पाटील

ch dada patil shivsmarak

नागपूर: अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी लागणा-या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. या कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या असून सर्वात कमी दराच्या निविदाधारकाशी वाटाघाटी करुन ते मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरच मार्गी लागेल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज,शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

साखरगाव येथील गुंजवणी नदीवरील पूल धोकादायक झाल्याबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना एका उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, दिलीप वळसे – पाटील यांनी यावेळी उपप्रश्न विचारले होते. राजगडावर जाण्यासाठी गुंजवणी नदीवरील पुलाची ऊंची वाढविण्याच्यासाठी हा पुल किती उंच केला पाहिजे हे तपासून त्याचे अंदाजपत्रक काढण्यात येईल.

येत्या अर्थसंकल्पात या कामाचा समावेश करुन ज्या दिवशी अर्थसंकल्प मंजूर केला जाईल त्याच दिवशी या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाईल. तत्पूर्वी सर्व प्रक्रिया करुन ठेवण्यात येईल. तसेच, राज्यातील ४०० पूलांवर सॉफ्टवेअर बसविण्यात आले असून त्याच्या मदतीने पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुलावरुन पाणी वाहून जात असेल तर जिल्हा प्रशासनाला एसएमएस जातो. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी या पुलावरील वाहतूक बंद करतात, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.