#Coronavirus : सिंहगडावरील ‘कोरोना’मुळे ‘हा’ नियोजित कार्यक्रम रद्द

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहेत.

याच पार्श्वभूमीवर हवेली पंचायत समितीच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळी मंगळवार होणारा पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला दरवर्षी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मार्गदर्शन करतात.

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे गडावर आज होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या वर्षी देखील या कार्यक्रमाचे पंचायत समिती हवेली यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.