छगन भुजबळांनी चुकीचं काम केलं नव्हतं; गुलाबराव पाटलांकडून तोंडभरुन कौतुक

Gulabrao Patil

जळगाव : दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ निर्दोष मुक्त झाले आहेत. कोर्टाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या मंत्र्याने माजी शिवसेना नेत्याचे म्हणजेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री भुजबळ यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्यानेच न्यायदेवतेने त्यांना निर्दोष सोडले आहे. पण त्यांना झालेला हा त्रास कधीही भरुन निघणार नाही. शेवटी न्यायदेवतेने हा न्याय दिलेला आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल. भुजबळ यांनी जे काम केले होते, ते योग्य पद्धतीने होते, यावर आज या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी भुजबळांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख , इरम शेख , संजय जोशी , गीता जोशी , पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांची नावे देखील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून वगळण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या