पराभवाचे चटके बसणारच आहेत, चंद्रकांत पाटलांनी पराभव सहन करण्याची शक्ती ठेवावी – छगन भुजबळ

chandrkantdada bhujbal

नाशिक : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

या निकालानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. ‘छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला,’ असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.

आता पाटलांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पराभव सहन करण्याची शक्ती देखील ठेवायला हवी. दुर्दैवाने त्यांना वारंवार पराभवाचे चटके बसणार आहेत. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलायला हवं, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

पाटील यांची भाषा ही अरेरावीची आहे. भाजप लोकशाहीची पायमल्ली करत ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणा हातातील शस्त्र म्हणून वापरत आहे. पाटील यांच्या वक्तव्यामुळे न्यायपालिकाही त्यांच्या हाती आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्याचे भुजबळ म्हणाले. लोकांवर खोट्या केसेस टाकणे, त्यासाठी यंत्रणा वापरणे भाजपकडून सुरु आहे. मात्र यावर बोलण्यात अर्थ नाही. माझ्या नजरेत चंद्रकांत पाटील यांनी तेवढी किंमत नाही, अशी बोचरी टीका भुजबळ यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या