कोरोनाग्रस्त छगन भुजबळ यांनी वाढवली पवार,झिरवळ,बनकर यांच्यासह दिग्गजांची डोकेदुखी

bhujbal

मुंबई – गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

गेल्या १ वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. या कालावधीत अनेकांना कोरोनाची लागण झाली तर काही जणांनी यामुळे आपले प्राणही गमावले. त्यातच आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्या आधीच अनेक राजकीय नेते विशेषतः महाविकास आघाडीतील मंत्री अचानक कोरोनाग्रस्त होऊ लागले आहेत.

नुकतीच गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती यानंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.दरम्यान, राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती.

कोव्हिडचा संसर्ग होवू नये म्हणून मोजक्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. मात्र आता या लग्न समारंभाला भुजबळांनी हजेरी लावल्याने अनेकांची चिंता वाढवली आहे. भुजबळांच्याबरोबर शरद पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार दिलीप बनकर यांच्यासह दिग्गज नेते लग्नसोहळ्याला उपस्थित होते. आता छगन भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्यांचीच चिंता आता वाढली आहे. याशिवाय भुजबळ यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी लावली होती यावेळी त्यांच्यासह अनेक दिग्गज देखील हजर होते त्यामुळे देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

नियमानुसार कोरोनाग्र्स्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केले जाते त्यामुळे भुजबळ यांच्या संपर्कात आलेले शरद पवार क्वारंटाईन होणार का? हा प्रश्न आता विचारला जातोय. दरम्यान, शरद पवार यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या