अन्नधान्य, औषधं, दुध-भाजीपाल्याचा साठा करण्याची गरज नाही – भुजबळ

bhujbal-1

मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी ही मोठी घोषणा केली.

याच पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ते म्हणाले, ‘अन्नधान्य, औषधं, दुध-भाजीपाल्याचा साठा करण्याची गरज नाही. तुमच्या या वस्तू तुमच्या जवळच्या वितरण केंद्रावर पोहचवण्याची पूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत’.

पुढे ते म्हणाले, ‘कोरोना संसर्गासाठी देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पुढील 3 आठवड्यांमध्ये हे सर्व संपेल असंही नाही. पुढची तयारी ठेवावी लागेल,’ अशी माहिती त्यांनी याबाबत बोलताना दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात अन्नधान्याचा अजिबात तुटवडा नाही. 6 ते 8 महिने पुरेल इतकं अन्नधान्य आपल्या कोठारांमध्ये पडून आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.