भुजबळांची तोफ धडाडणार ! भाषणाची तारीख ठरली

chagan bhujbal

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून दोन वर्षांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरु आहेत. आता तिथून बाहेर पडल्यानंतर जोरदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.आपल्या वेगळ्या भाषणशैली साठी प्रसिद्ध असणाऱ्या भुजबळांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्टाचं लक्ष असणार आहे.

पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे जाहीर भाषण करणार आहेत.याच ठिकाणी भुजबळांची तोफ धडाडणार आहे.

छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्चित झाले आहे.

भुजबळ पुन्हा राजकीय मैदानात उतरणार आहेत. मात्र त्यासाठी अजून महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 2 वर्षानंतर जामीन मंजूर केला आहे. भुजबळ यांनी २ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर केला . त्यामुळे गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५ (१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.

Loading...