fbpx

भाजयुमोच्या पुणे शहराध्यक्षांची चमकोगिरी,विरोधी पक्षनेत्यांनी साधला मंत्रिमंडळावर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा : महापालिका भवनासमोर अनधिकृत जाहिरात फलक उभारल्या प्रकरणी भाजपचे विद्यमान नगरसेवक आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. अशाच प्रकारे याच ठिकाणी अनधिकृत जाहिरात लावल्याप्रकरणी मागील आठवड्यात न्यायालयाने भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिकेस दिलेले आहेत.

दरम्यान, हडपसरमध्ये नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले आहेत त्यामुळे अर्धे मंत्रिमंडळ हडपसरमध्ये अनधिकृतपणे लटकलेल आहे. त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि महापालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या कनिझ सुखरानी यांनी शहरातील बेकायदा फ्लेक्सबाजी विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी प्रत्येक आठवडयात सुरू आहे. यादरम्यान सुखरानी यांच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही शहरात राजकीय कार्यकर्त्यांकडून बेकायदेशीररित्या फ्लेक्स लावण्यात येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी त्यांनी मागील आठवड्यात महापालिकेसमोर भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या आवाढव्य फ्लेक्ससह येरवडा परिसरातील दोन आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेला एक अशा चार फ्लेक्सचे फोटोच न्यायालयात सादर केले.यावर न्यायालयाने फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, महापालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने याप्रकरणी नगरसेवक अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाला दिले असतानाच या याचिकेची 2 नोव्हेंबर रोजी पुन्हा मुंबईत सुनावणी होती. त्या दिवशी नगरसेवक पोटे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही पालिकेसमोरच मोठा फ्लेक्स लावला होता. त्याची माहिती पुन्हा याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने महापालिकेस पोटे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.