कोनशिलेेवर नाव येण्यासाठीच उदघाटनाची घाई; विरोधकांचा सत्ताधारी भाजपवर आरोप

पुणे : महापालिका नवीन इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतानाही उद्घाटनाची घाई करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणत पुणे महापालिका सभागृहात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून छत्री आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर सभागृहातच ‘ये रे ये रे पाऊसा’ गाणे वाजवत निषेध व्यक्त करण्यात आला.

अतिघाई आणि संकटात जाई असं काम सत्ताधारी भाजपने केले आहे, आम्ही बांधकामासाठी वेळ देण्याची मागणी करत होतो, पण केवळ कोनशीलेवर नाव येण्यासाठी घाईघाईत उदघाटन करण्यात आल्याचा आरोप  महापालिका विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी केला आहे. तसेच या सर्व प्रकारामुळे भाजपने पुणेकरांचं  नाक कापण्याचं काम केल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

तर चांगल्या कामासाठी पुणे शहराच्या नाव देशात यावं अस आम्हा सर्वांना वाटत, पण केवळ कोनशीलेवर नाव येण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून घाई झाली. ही केवळ सभागृहातील गळती नाही तर 24 तास पाणी योजना, पालिका अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये गळती सुरू असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, कार्यक्रमावेळी टेरेसमध्ये कचरा अडकल्याने पाणी आले, या विषयावर आम्ही बैठक घेऊन ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत, रिपोर्ट आल्यानंतर ठेकेदार आणि स्मबंधीत अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचं सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. तसेच विरोधकांनी कोणत्या स्तरावर टीका आणि चर्चा करायची याच भान ठेवायला हवं असल्याचंही ते म्हणाले.

पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उदघाटन मागील आठवड्यात उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच नवीन सभागृहाला गळती लागली, त्यामुळे इमारतीचे काम अपूर्ण असतानाही उदघाटनाचा घाट घालण्यात आल्याच उघड झालं आहे. आता याच मुद्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.