fbpx

बुरखा घालून खेळणार नाही! भारतीय महिला खेळाडूची एशियन चॅम्पिअनशिपमधून घेतली माघार

टीम महाराष्ट्र देशा- भारताची महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पिअन सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअनशिपमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. सौम्याने इस्लामिक देश इराणमध्ये स्कार्फ किंवा हिजाब घालणं अनिवार्य असल्या कारणाने हे आपल्या वैयक्तिक अधिकारांचं उल्लंघन असल्याचं सांगत हा निर्णय घेतला आहे. २६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान एशियन चॅम्पिअनशिप पार पडणार आहे. इराणमध्ये महिलांनी बुरखा घालणं अनिवार्य आहे. पण सौम्या स्वामीनाथनने इराणचा हा हुकूमशाही कायदा मानण्यास नकार दिला आहे. यामुळेच सौम्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.

भारताची क्रमांक 5 ची बुद्धिबळपटू सौम्याने फेसबुकवर पोस्ट लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ‘मला जबरदस्तीने स्कार्फ किंवा बुरखा घालायचा नाही. इराणी कायद्यानुसार जबरदस्तीने बुरखा किंवा स्कार्फ घारणं माझ्या मूलभूत मानवी हक्काचं सगळ उल्लंघन आहे. हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्यासह विवेक आणि धर्माचं उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या अधिकारांची सुरक्षा करण्यासाठी माझ्याकडे दुसरा कुठलाही रस्ता नसल्याने मी इराणला जाणार नाही’, असं तिने फेसुबक पोस्टमध्ये म्हटलं आहे.