चेंबूर दुर्घटना; ‘मृतांच्या कुटुंबीयांना मनपाने दहा लाखांची मदत द्यावी’, आठवलेंची मागणी

मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळली.

दरडीचा भार संरक्षक भिंतीवर आल्याने ही भिंतच घरांवर कोसळली. चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर रिपाईंचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महानगर पालिकेने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी केली आहे.

‘मुंबईत अतिवृष्टीने दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांना रिपब्लिकन पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची सांत्वनपर मदत करावी. डोंगराळ भागातील झोपडीवासीयांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. पुन्हा अशी दुर्घटना घडू नये याची मनपाने खबरदारी घ्यावी’ असा सल्लादेखील आठवले यांनी दिला आहे.

दरम्यान, मृतांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरू ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या