fbpx

बनावट कागदपत्रांनी फ्लॅटची विक्री करून फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर  : खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट खरेदीखत दाखवून त्याआधारे ग्राहकाला फ्लॅटची खरेदी करून देऊन 14 लाख 60 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित ग्राहकाच्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी तीन जणांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सूर्यकांत रावसाहेब कोल्हे(वय 50,राहाणार रेल्वे स्टेशन रोड,अहमदनगर)यांनी या प्रकरणी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हे यांच्या फिर्यादीनुसार पोलीसांनी अजित कृष्णराव कदम(वय 39,राहाणार देवळाली प्रवरा),संजय रत्नाकर झिंजे(वय 60,राहाणार चितळे रोड,अहमदनगर) व गिरीष सुभाष गायकवाड(वय 37,राहाणार एकवीरा चौक,अहमदनगर) या तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कोल्हे यांनी झिंजे व गायकवाड यांच्या मध्यस्थीने सावेडी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये अजित कदम याच्या कडून एक फ्लॅट खरेदी केला.

या व्यवहारापोटी कोल्हे यांनी 14 लाख 60 हजार रूपये दिले होते.सदर फ्लॅटचे खरेदीखत करताना सदर फ्लॅटचा तलाठी कार्यालयातील जुना उतारा वापरून बनावट खरेदीखत तयार केले.या बनावट खरेदीखताच्या आधारे आरोपींनी रजिस्ट्रार कार्यालयात सदरचा व्यवहार केला.मात्र दरम्यान हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कोल्हे यांच्या लक्षात आले.त्यावेळी कोल्हे यांनी अहमदनगरच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तोफखाना पोलीसांनी झिंजे,कदम व गायकवाड या तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.