हे सरकार मदतीतं पण राजकारण करतयं , जाहिरातबाजीवरून चव्हाणांनी फडणवीसांना फटकारले

टीम महाराष्ट्र देशा : पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत म्हणून प्रशासनाने मोफत अन्नधान्य वाटप केले आहे. मात्र ही मदत करताना भाजप सरकारने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. या जाहिरातबाजीवरून फडणवीस सरकार सकाळपासून चांगलेच टोले खात आहे. तर सामान्य नागरिकांनी देखील सरकारच्या या जाहिरातबाजीचा निषेध केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील भाष्य केले आहे.

जाहिरातबाजी कुठे आणि केव्हा करायची, याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. एक तर सरकार वेळेवर पूरग्रस्तांपर्यंत पोहोचू शकलं नाही. आता मदत सुरू झालीय तर त्यातही राजकारण केलं जातंय, जाहिरातबाजी केली जातेय. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निर्लज्जपणाचा कळस आहे, असे ट्विट करत अशोक चव्हाण यांनी सरकारप्रति संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान सरकारच्या या संधिसाधू प्रवृत्तीला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. तर हे सरकार केवळ जाहिरातबाजीच्या कामाचे असल्याची टीका अनेक नेत्यांनी केली आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात येत आहेत. तसेच, स्थानिक पुढारी समिर शिंगटे आणि सुधाकर भोसले यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली आहे.