पीएनबी घोटाळा प्रकरण : नीरव मोदीविरोधात आरोपपत्र दाखल

nirav-modi-pnb

मुंबई – पीएनबी घोटाळा प्रकरणात नीरव मोदी याच्यासह २३ जणांविरोधात सीबीआयनं विशेष सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. दरम्यान त्यापैकी १९ जण अटक करण्यात आली असून, ४ जण फरारी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात पीएनबीच्या माजी एमडी आणि सीईओ उषा अनंतसुब्रामणियन यांच्या नावाचा देखील समावेश आहे. त्या २०१६ साली त्या एमडी आणि सीईओ होत्या. सध्या त्या अलाहाबाद बँकेच्या प्रमुख आहेत.

नीरव मोदीसह पीएनबीचे संचालक ब्रम्हाजी राव आणि सांजी सरन आणि जनरल मॅनेजर नेहल अहद यांच्या नावाचा समावेश आहे. आंतरबँक संदेशवहनाची स्वीफ्ट मेसेजिंग प्रणालीचा दुरुपयोग केल्याचा आरोप पीएनबीच्या अधिकाऱ्यांवर आहे. या सगळ्या घोटाळ्यात नीरव मोदीच्या कंपनीनं लेटर आॅफ अंडरटेकिंग आणि लेटर्स आॅफ क्रेडिट यांचा दुरुपयोग करत देशाबाहेरील कंपनीत वळते कसे केले याचा उल्लेख आरोपपत्रात आहे.

पीएनबीच्या ब्रॅडी ब्रँचनं नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या कंपन्यांसाठी चुकीच्या पद्धतीनं १४४ लेटर आॅफ अंडरटेकिंग दिली असल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.या सगळ्या प्रकरणांत नीरव मोदी, त्याचा भाऊ निशल मोदी आणि नीरव मोदीचा अधिकारी सुभाष परब यांच्या या घोटाळ्यातील भूमिकेविषयी माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.