तेजप्रतापच्या लग्नात लालूंच्याच कार्यकर्त्यांनी पळवली भांडी

Lalu-Prasad-Yadav

पाटणा- राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव याचा विवाह काल थाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. मात्र शांततेत पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याला राजद कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे गालबोट लागले.

तेजप्रताप यांच्या विवाहाला हजारो लोक उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव व्हीआयपी पाहुणे व माध्यमांचे प्रतिनिधी यांना विशेष सोय करण्यात आली होती व त्यांच्या आणि इतर पाहुण्यांमध्ये अडथळे लावले होते. मात्र तेजप्रताप यांनी ऐश्वर्या यांना पुष्पमाला घालताच राजदचे कार्यकर्ते एकच गोंधळ घालत आरडाओरडा करत खाद्यपदार्थ, वस्तूंवर तुटून पडले. बहुतेकांनी पदार्थ आणि क्रॉकरी लुटून नेली.

काहींनी त्याची मोडतोड केली. जेवणाच्या केटररने आपली अनेक भांडी गायब झाल्याचे सांगितले. याशिवाय अनेक वस्तू मोडूनही टाकण्यात आल्या आहेत. सर्व परिसरात उलट्यासुलट्या पडलेल्या खुर्च्याही दिसून येत होत्या. माध्यमांच्या प्रतिनिधींनीही आपल्याशी कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याचे सांगितले व आपल्या उपकरणांची मोडतोड झाल्याचे सांगितले.