fbpx

वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन – देवेंद्र फडणवीस 

देवेंद्र फडणवीस

सांगली : तीन वर्षापूर्वी जत तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती. मात्र जलसंधारणाच्या कामामुळे हा तालुका हळूहळू टँकरमुक्त होऊ लागला आहे. समाजाने मनावर घेतले तर काय परिवर्तन होऊ शकते, याचा प्रत्यय मला बागलवाडीत आला. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून धर्म, जात, गट, पक्ष विसरून पाण्यासाठी लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे गावागावात परिवर्तन होऊ लागले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जत तालुक्यातील बागलवाडी येथे पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांच्या पाहणीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, सत्यवान देशमुख, जैन फाउंडेशनचे शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एखाद्या योजनेला जोपर्यंत जनतेची साथ मिळत नाही, ती योजना जनतेची होत नाही, तोपर्यंत ही यशस्वी होत नाही. जनतेची साथ मिळावी, लोकसहभाग वाढावा, योजना लोकांना आपलीशी वाटावी म्हणून जलयुक्त शिवारसारखी योजना आखली. तिला अमीरखान यांच्या वॉटर कप स्पर्धेची साथ मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावीच्या ग्रामस्थांनी जलसंधारणाचा एकच ध्यास घेऊन श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला, याच मंत्राच्या आधारावर ७५ तालुक्यातील हजारो गावे झपाटून काम करीत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीन साडेतीन वर्षापूर्वी राज्यात ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण, दुष्काळी होता. कितीही मोठी धरणं बांधली तरी या भागात दुष्काळमुक्ती होऊ शकत नव्हती. धरणं आवश्यक आहेतच, पण त्याचबरोबर विकेंद्रीत पद्धतीने पाणलोटाचे स्त्रोत निर्माण करणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाअखेरीस राज्यातील जवळपास २० हजार गावे दुष्काळमुक्त झालेली असतील, असा विश्वास व्यक्त करून याचे श्रेय त्यांनी जनसहभागाला दिले.